छगन भुजबळ पनवती, त्यांच्यामुळेच शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती, मनोज जरांगे यांची टिका
By -Marathi News Katta
नोव्हेंबर ३०, २०२३
0
मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण हवे असल्याचा पुनरुच्चार केला आहे. जर मराठ्यांच्या नोंदी ओबीसी म्हणून सापडत आहेत तर मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण देण्यात यावे अशीही मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.
जालना | 30 नोव्हेंबर 2023 : राज्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. मंत्र्याने दौरा केला म्हणून शेतकऱ्याचं भलं होत असं काही नाही. प्रशासनाने योग्य पंचनामे करायला हवे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ नाशिकचा पाहणी दौरा करीत आहेत. या पाहणी दौऱ्यात मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाड्यांना अडविले आहे. यावर मनोज जरांगे यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी छगन भुजबळ हे पनवती आहेत, त्यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागण्याची टिका केली आहे.केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. यावर बोलताना मनोज जरांगे यांनी आम्ही कधी म्हणालो की ते आम्हाला ओळखतात. मराठ्यांना चांगले माहीती आहे की आरक्षण कसं घ्यायचं. आम्हाला किती अभ्यास आहे हे महत्वाचं नाही तर गोरगरीबाचं कल्याण होतंय हे महत्वाचं आहे. उगाच आडवं पडू नये. अशी वाक्य वापरून गोरगरीबांच्या ताटात माती कालवायचं काम करु नये असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. यावर जरांगे पाटील यांनी, आम्हाला अंधारात ठेऊन आमच्याशी कोणताही दगाफटका करू नका,मागे काय झालं माहीत नाही, पण आम्ही ओबीसी असल्याच्या लाखो नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे आम्हाला बहाणे सांगू नका, आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे असाही इशारा जरांगे पाटल यांनी दिला आहे. शिवाय मुख्यमंत्री मराठा समाजाला देणार असलेले वेगळं आरक्षण कोणते ? हे आधी त्यांनी स्पष्ट करावं असंही त्यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात काय झालं हे आम्हाला सांगू नका आता काय करायचं हे ठरवा असंही ते म्हणाले. बीडच्या जाळपोळीमागे मोठा हात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे ? यावर आम्हाला आता यावर काही बोलायचं नाही, या जाळपोळमध्ये मराठ्याचं आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.
तीन दिवसांचा लातूर दौरा
मनोज जरांगे पाटील यांचा पुढील आठवड्यात तीन दिवसांचा लातूर जिल्ह्याचा दौरा आहे. जळकोट, उदगीर, निलंगा आणि औसा इथे त्यांच्या आरक्षण सभांचे आयोजन करण्यात आले आहे. 9,10 ,आणि 11 डिसेंबर रोजी त्यांचा दौरा असणार आहे. लातूरसह जिल्ह्यातल्या ज्या भागात अगोदर सभा झाल्या आहेत ,तो भाग वगळून मनोज जरांगे यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
Tags: